अमरावती : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीचा थेट प्रसारण अमरावती जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या सभागृहात दाखवण्यात आला.शपथविधी सुरू होताच उपस्थित वकिलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि शपथ घेण्याचा क्षण येताच सर्वांनी एकमेकांना मिठाई भरवून ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा केला. अनेक वकिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.”आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही,” असे म्हणत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एका सामान्य घरातून, सरळ-साध्या वकिलाच्या भूमिकेतून आज सर्वोच्च न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेल्या गवई यांच्या यशाचा अभिमान व्यक्त करत, अनेक जुन्या वकिलांनी त्यांच्यासोबत काम केलेल्या आठवणींना उजाळा दिला.”आज आमच्या मातीतला मुलगा देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला आहे. हे आमचं भाग्य आहे. आम्ही त्यांना वकिल म्हणून घडताना पाहिलंय, आज न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च नेतृत्व करताना पाहतोय,” असे म्हणत वकिलांनी एकच जल्लोष केला.बार असोसिएशनच्या आवारात ढोल, ताशे, नगारे वाजवत अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. गवई यांच्या साधेपणाचे, त्यांचं कर्तृत्व आणि संघर्षाचे किस्से चर्चेत होते.”