कार्यालय सील केल्याची माहिती
मुंबई : राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी एसीबीने मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन यांच्या विभागात छापा टाकत ३५ हजार रुपयांची लाच घेताना एका लिपिकाला रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली असून संबंधित कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे याने लातूर येथील एका औषध दुकानदाराकडून परवाना निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित दुकानदाराचा मेडिकल परवाना रद्द करण्यात आला होता आणि तो पुन्हा सुरू करण्यासाठी मंत्र्यांच्या कार्यालयातून निर्णय घ्यावा लागत होता. या प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात ढेरंगे याने लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ढेरंगे याला रंगेहात अटक केली. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान ढेरंगे याच्यासह कार्यालयातील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान ढेरंगे याने ही रक्कम नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासगी सचिव हे मंत्र्यांचे कार्यालयातील प्रमुख अधिकारी मानले जात असल्याने या दाव्यामुळे प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. मंत्रालयातच अशा प्रकारे लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबीकडून संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या असून पुढील तपासात कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.