मंत्रालयात एसीबीचा छापा; झिरवाळ म्हणाले, संबंध आढळल्यास राजीनामा देईन

0

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात छापा टाकला आणि संबंधित कार्यालय सील करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मंत्री झिरवाळ यांनी दिल्लीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हणाले, की संबंध आढळल्यास राजीनामा देईन अशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मी परवापासून दिल्लीत आहे. हा प्रकार चुकीचा आहे आणि असं व्हायला नको होतं. ढेरंगे हे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीसाठी लागणारे कागदपत्र तयार करण्याचं काम ते करतात. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे असून उसनवारीवर आमच्याकडे आले होते. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. ज्याने चुकी केली त्याला जाब द्यावा लागेल,” असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा खात्याशी किंवा मंत्र्यांच्या वैयक्तिक पातळीवर कोणताही संबंध नसल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, “खातं, मंत्री किंवा मंत्र्यांचे पीए यांचा या प्रकाराशी काही संबंध नाही. जे घडलं ती आमची नैतिक जबाबदारी आहे, मात्र कोणालाही वाचवले जाणार नाही.” संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीवेळी गृहखात्याकडून तपास होतो, परंतु त्याच्या पूर्वीच्या नोंदींबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजीनाम्याबाबत विचारले असता झिरवाळ म्हणाले, “जर या प्रकरणाची साखळी माझ्यापर्यंत आली, माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. माझ्यावर जबाबदारी आली तर नक्कीच विचार करेन. पक्ष नेतृत्वाशी अद्याप चर्चा झालेली नाही, पण मी त्यांच्याशी बोलणार आहे. कोणत्याही विभागात अशा घटना घडल्या तर त्या चुकीच्याच आहेत.” तसेच आपण टार्गेट होत असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. “मला कोणी टार्गेट करणार नाही. माझा स्वभाव सर्वांना माहिती आहे. मी कधीच काही चुकीचं करणार नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, अटकेत असलेल्या राजेंद्र ढेरंगेने ही रक्कम खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख समजले जातात. त्यामुळे या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याची चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत तपासाचा अहवाल आणि त्यानुसार होणारी कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागात ही कारवाई करण्यात आली. लातूरमधील एका औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. संबंधित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी मंत्र्यांच्या स्तरावर सुनावणी होऊन निर्णय घेतला जातो. या प्रक्रियेत मदत करण्याच्या नावाखाली राजेंद्र ढेरंगे याने संबंधित नागरिकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता तडजोडीअंती ढेरंगे ३५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला आणि रक्कम घेत असतानाच एसीबीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कार्यालयातील आणखी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech