अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर  

0

मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय, चोंडीत राज्य मंत्रिपरिषदेची बैठक

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंगळवारी चोंडी (जि अहिल्यानगर) येथे झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” आणि “आदिशक्ती पुरस्कार”, अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन, राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन जागतिक स्तरावर करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट दूरदर्शन आणि ओटीटी माध्यमावरुनही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

चित्रपट निर्मितीसाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठीची संस्था आणि दिग्दर्शक निवडीसाठी ७ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यानुसार या शासन निर्णयांमध्ये तरतूद करण्यात आलेली छाननी आणि निवड समिती दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मिती संस्था निवडक करेल.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांना अनुदान, सहाय्यक अनुदाने यामधील अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यासही मान्यता देण्यात आली.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” आणि “आदिशक्ती पुरस्कार” :  महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरु करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे आरोग्याबाबत समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे, पंचायत राज पध्दतीत महिला नेतृत्वाचा सहभाग वाढविणे, महिलांना आर्थिक सक्षम करणे आदी या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

आदिशक्ती अभियान राबविण्यासाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार वितरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही बदल अथवा काही सुधारणा करणे अपेक्षित असेल तर महिला आणि बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीस अधिकार प्रदान करण्यासही मान्यता देण्यात आली.

राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय : राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयल स्थापन करण्यास आणि त्यासाठीच्या आवश्यक पदांना आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

सध्या, राहुरी येथे चार दिवाणी न्यायालये कनिष्ठ स्तर कार्यरत आहेत. त्यापुढील स्तरावरील येथील प्रकरणे अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथे चालविली जातात. या न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणाची संख्या अनुक्रमे ९ हजार २३५ व २१ हजार ८४२ इतकी आहेत. राहुरी ते अहिल्यानगर न्यायालयामधील अंतर ४५ किलोमीटर इतके आहे. राहुरी तालुक्याची सीमा संगमनेर तालुक्यापर्यंत लांब आहे. त्यामुळे पक्षकारांना दूर अंतरावर जावे लागते. या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित प्रकरणे, अहिल्यानगर न्यायालयापासूनचे अंतर, न्यायदान कक्षाची उपलब्धता या बाबींचा विचार करून, उच्च न्यायालयाच्या “न्यायालय स्थापना समितीने” राहुरी जि. अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकाऱ्याचे एक पद, कर्मचाऱ्यांची २० पदे आणि ४ मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मंत्रिपरिषदेने मंजुरी दिली.

मिशन महाग्रामला २०२९ पर्यंत मुदतवाढ : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मिशन महाग्राम कार्यक्रमाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान टप्पा दोन म्हणजेच मिशन महाग्राम राबविण्यास सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली होती. या मिशन महाग्रामला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्याच्या प्रस्तावास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

अहिल्यानगरमध्ये ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करणार : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास आणि त्यासाठी आवश्यक खर्च यासाठी सुमारे ४८५ कोटी ८ लाख रुपयांच्या अपेक्षित खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार या महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा पुढील सात वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

तसेच महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी आवश्यक तसेच सुयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर या जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालय स्थलांतरीत करण्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्यात आली आहे.

तलाव, घाटांच्या जतनासाठी विशेष योजना : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारलेल्या तलाव, बारव, कुंड, घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीच्या जतनासाठी विशेष योजना राबविण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मृद आणि जलसंधारण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ३४ योजनांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त सर्व्हेक्षणात आढळून येणाऱ्या पाणी वाटप प्रणालीचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये जलाशयातील गाळ काढणे, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. – राज्यात असे तीन ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी) आहेत. या योजनेत राज्यातील अशा १९ विहिरी, सहा घाट, सहा कुंड अशा एकूण ३४ जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करण्यात येतील.

राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज्यातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या तीर्थस्थळांमध्ये चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : ६८१. ३२ कोटी, अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार (लेण्याद्री वगळता) – १४७. ८१ कोटी, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : १ हजार ८६५ कोटी, श्री क्षेत्र जोतीबा मंदिर विकास आराखडा : २५९.५९ कोटी, नाशिकमधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा – २७५ कोटी, कोल्हापूर श्री क्षेत्र महालक्ष्मी विकास आराखडा – १ हजार ४४५ कोटी रुपये, नांदेड जि्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा – ८२९ कोटी रुपये, या आराखड्यांचा समावेश आहे.

इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला आज राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. राजे यशवंतराव होळकर यांनी १७९७ ते १८११ या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेचे नाव राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असे करण्यात आले. या योजनेतून २०२१ -२२ ते २०२४-२५ अखेर १६२ शाळांची निवड करण्यात आली असून या शाळांत धनगर समाजातील ३१ हजार ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यासाठी २८८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वसतीगृह योजनेस नाव : धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येकी २०० विद्यार्थी क्षमतेची ही वसतीगृह असणार आहेत. यात मुलांसाठी १०० क्षमतेचे तर मुलींसाठी १०० क्षमता आहे.

मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था : अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेसाठी आवश्यक यंत्रसामग्री, हत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ कोटी ८० लाख १९ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech