नवी दिल्ली : अमेरिकेत येणाऱ्या तीव्र हिवाळी वादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी २५-२६ जानेवारीसाठी न्यूजर्सीमधील नेवार्कला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये, एअर इंडियाने माहिती दिली की, परिसरात जोरदार हिमवृष्टी आणि तीव्र वादळाच्या अंदाजामुळे रविवार आणि सोमवारी न्यू यॉर्क आणि न्यू जर्सीतील नेवार्क जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रविवार सकाळपासून सोमवारपर्यंत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील न्यू यॉर्क, न्यू जर्सी आणि आसपासच्या भागात जोरदार हिमवृष्टीसह तीव्र हिवाळी वादळ येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विमान वाहतुकीवर लक्षणीय परिणाम होईल.
निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी आणि सोयीसाठी, २५ आणि २६ जानेवारी रोजी न्यू यॉर्क आणि नेवार्कला जाणारी आणि येणारी सर्व एअर इंडियाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जर तुम्ही या तारखांना आमच्यासोबत प्रवास बुक केला असेल, तर आमचे समर्पित पथक तुम्हाला सर्व शक्य ती मदत करेल. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या २४x७ कॉल सेंटरशी +९१ ११६९३२९३३३, +९१ ११६९३२९९९९ वर संपर्क साधा. तुम्हाला आमची वेबसाइट http://airindia.com देखील तपासण्याची विनंती केली जाते.”