नवी दिल्ली : एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी (परम विशिष्ट सेवा पदक) यांनी आज, २ मे रोजी आयएएफच्या हवाई कर्मचारी उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. एअर मार्शल यांनी त्यांचे शालेय शिक्षण देहरादून येथील राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय (आर आय एम सी) येथे पूर्ण केले आणि त्यानंतर ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये दाखल झाले. जून 1985 मध्ये ते राष्ट्रपती सुवर्णपदकासह अकादमीमधून उत्तीर्ण झाले. ७ जून १९८६ रोजी त्यांना भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले.
एअर मार्शल यांना विविध प्रकारच्या विमानांवर ३६०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी पायलट असण्यासोबतच एअर मार्शल हे अमेरिकेतील एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत. त्यांनी आयएएफ टेस्ट पायलट्स स्कूल आणि वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये डायरेक्टिंग स्टाफ म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरच्या विस्तृत अनुभवात विविध शस्त्रे आणि प्रणालींच्या ऑपरेशनल चाचण्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये १९९९ मध्ये कारगिल ऑपरेशन्स दरम्यान ‘लाईटनिंग’ लेझर डेझिग्नेशन पॉडच्या कार्यवाहीमधील महत्त्वाच्या भूमिकेचा समावेश आहे.
एअर मार्शल यांनी २०१३ ते २०१६ दरम्यान पॅरिस येथे एअर अटॅच म्हणून काम केले. त्यांनी हवाई मुख्यालय (वायू भवन) येथे हवाई दलाचे उपप्रमुख म्हणूनही काम केले आहे. हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते दक्षिण पश्चिम हवाई कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. त्यांच्या विशिष्ट सेवेची दखल घेऊन एअर मार्शल यांना २०२५ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक, २०२२ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि २००८मध्ये वायू सेना पदक या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.