पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन आज बारामती येथील कऱ्हा आणि निरा नद्यांच्या संगमावर करण्यात आले. काटेवाडी गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पवित्र स्थळी पवार कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी उपस्थित होते. यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे, श्रीनिवास बापू पवार आणि युगेंद्र पवार यांचा समावेश होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी हा विधी पार पडला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण असून, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाचा एक मोठा आधार हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे. बारामतीसह राज्यभरातून अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अतिशय भावूक होऊन अजितदादांच्या अस्थी नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.