सीआयडीकडून अजित पवारांच्या खाजगी सचिवांची चार तास चौकशी

0

मुंबई : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशीला गती दिली आहे. या प्रकरणात त्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याचे नियोजन कोणी केले होते, तसेच या दौऱ्याबाबत आदल्या दिवशी नेमकी कोणती चर्चा झाली होती, यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सीआयडी अधिकारी माहिती घेत आहेत.

मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले अजित पवार यांचे खासगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ कोसळले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, अपघातामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असून, त्यानुसार सीआयडीकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची शुक्रवारी सुमारे चार तासांहून अधिक काळ चौकशी केली. या चौकशीत अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजीच्या बारामती दौऱ्याचे संपूर्ण नियोजन, प्रवासाचे तपशील, २७ जानेवारी रात्री झालेल्या चर्चा, तसेच दौऱ्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर प्रश्न विचारण्यात आले. मिळालेल्या उत्तरांच्या आधारे अपघातास तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा अन्य कोणती कारणे जबाबदार आहेत का, याचा अंदाज बांधण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यातील काही राजकीय नेत्यांनी या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केल्याने, त्या अनुषंगानेही सीआयडी अधिकारी विविध शक्यतांचा तपास करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही चौकशी केवळ तांत्रिक बाबींपुरती मर्यादित न राहता, सर्व अंगांनी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनाचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, तसेच वैमानिकांशी झालेला संवाद यासारखी तांत्रिक माहिती संकलित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्यांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. यामध्ये विमान जमिनीवर आदळल्यानंतर झालेला परिणाम, विमानाला आग कधी व कशी लागली, तसेच विमानाच्या सांगाड्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवली जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech