आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले – राज्यपाल

0

बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – मुख्यमंत्री

मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार चित्रा वाघ, आमदार अमित साटम, माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, माजी खासदार राहुल शेवाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. असे युगपुरुष व्यक्तिमत्त्व जगातून गेले तरी त्यांचे विचार व कार्य जनतेच्या अंत:करणात सदैव जिवंत राहतात, त्यातूनच बाबासाहेब अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले.

समाजात विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे त्यांनी नमूद केले.आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महामानव बाबासाहेबांचे विचार राष्ट्राला मार्गदर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या लोकशाहीला दृढ पाया दिला. त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले, असेही उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech