गांधीनगर : कोणत्याही मंचावर या, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे. खरंतर शेतकऱ्यांचे नुकसान कोणी केले, यावर उघड चर्चा व्हावी, असे खुले आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले आहे. कारण मोदी सरकारने प्रत्येक करारात शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. काँग्रेसने ७० वर्षांत केवळ एकदाच कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना गोंधळात टाकले. याउलट, मोदी सरकार गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट ६ हजार रुपये जमा करत आहे, जेणेकरून त्यांना कर्ज घेण्याची गरज भासू नये, असेही शाह म्हणाले.
गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे भारताच्या पहिल्या सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) चे उद्घाटन केले. त्यानिमित्त ते बोलत होते. काँग्रेस आणि तिचे नेतृत्व नेहमीच जनतेला दिशाभूल करत असते. मोदी सरकारने व्यापार करारांमध्येही शेतकरी आणि डेअरी क्षेत्राचे हित सुरक्षित ठेवले आहे, काँग्रेस केवळ चुकीची माहिती पसरवत आहे. संसदेत राहुल गांधी शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करतात, मात्र त्यांनी हेही सांगायला हवे की, मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांकडून किती धान्य खरेदी करण्यात आले. त्या तुलनेत नरेंद्र मोदी सरकारच्या १० वर्षांत किती धान्य खरेदी झाले. सध्याच्या सरकारने काँग्रेसच्या तुलनेत १५ पट अधिक धान्य खरेदी केली आहे, मात्र ही बाब राहुल गांधींना दिसत नाही, अशा शब्दात शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
शाह पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठीचे बजेट फक्त २६ हजार कोटी रुपये होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तो १ लाख २९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. हेच शेतकऱ्यांप्रती सरकारच्या बांधिलकीचे उदाहरण आहे. मी राहुल गांधींना खुले आव्हान देतो की, व्यापार करारांच्या मुद्द्यावर राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या करारांमध्ये शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. डेअरी क्षेत्राबाबत पसरवण्यात येणाऱ्या शंकांचा फेटाळा लावत त्यांनी स्पष्ट केले की, डेअरी सेक्टर पूर्णपणे संरक्षित आहे. तसेच भारतीय कृषी उत्पादने आणि मच्छीमारांच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत, असेही शाह यांनी सांगितले.