अकोला : विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्स जळाल्यामुळे डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी तातडीने पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार असून अपघाताची माहिती “लवकरच” मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तोपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीतून निघाले, ते कुठल्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले होते का, तसेच संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ,या सर्व बाबी २८ जानेवारी २०२६ रोजीच्या दिनांक व वेळेसह महाराष्ट्राला कळवाव्यात, अशी त्यांनी विनंती केली आहे. अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध सर्व पुरावे आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, या मागणीमुळे संबंधित यंत्रणांवर पारदर्शकतेचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.