दहशतवादी हालचालींचा संशय, एटीएसचे यवतमाळ, नगरमध्ये २१ ठिकाणी छापे

0

मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संशयित दहशतवादी हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन जिल्ह्यांत धडक शोधमोहीम राबवली. एटीएसने यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील २१ ठिकाणी छापे टाकत चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही तरुणांना दहशतवादी संघटनांशी संपर्क साधून सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

एटीएसने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे १४ ठिकाणी तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) येथे सात ठिकाणी शोधमोहीम राबवली. राज्यात तरुणांचे कट्टरपंथीकरण होत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार एटीएसने जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. संशयितांशी संबंधित घरे, कार्यालये आणि इतर ठिकाणांसह १४ ठिकाणी तपास सुरू असून पथकांनी आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्रीनंतर सुरू केलेल्या कारवाईत दोन्ही जिल्ह्यांतील २० पेक्षा अधिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून डझनभराहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या शोधमोहीमेदरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून संशयितांची चौकशी सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या कारवाईसाठी मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात सात ठिकाणी अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली असून तेथूनही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech