देशभरात ३१ ऑक्टोबर पर्यंत १,८०,९०६ आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत

0

नवी दिल्ली : आयुष्मान आरोग्य मंदिर -एएएम पोर्टलवर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारतातील उप-आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करून एकूण १,८०,९०६ आयुष्मान आरोग्य मंदिरे (एएएम ) पूर्वीची आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. प्रदान केल्या जाणाऱ्या प्रमुख सेवांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या पाच सामान्य असंसर्गजन्य रोगांसाठी व्यापक तपासणी सेवांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रम पोर्टलनुसार, ३१.१०.२०२५ पर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उच्च रक्तदाबासाठी ३८.७९ कोटी तपासणी, मधुमेहासाठी ३६.०५ कोटी तपासणी, तोंडाच्या कर्करोगासाठी ३१.८८ कोटी तपासणी, स्तनाच्या कर्करोगासाठी १४.९८ कोटी तपासणी आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी ८.१५ कोटी तपासण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, देशभरातील सर्व कार्यरत आयुष्मान आरोग्य मंदिरांवर उपलब्ध असलेल्या टेलिकन्सल्टेशन सेवांमुळे लोकांना तज्ज्ञ सेवा उपलब्ध होतात, ज्यामुळे प्रत्यक्ष पोहचणे, सेवा प्रदात्यांची कमतरता यासारख्या समस्या दूर होतात आणि उपचारात सातत्य राहते.एएएममधून ३१.१०.२०२५ पर्यंत दूरध्वनीमार्फत एकूण ४१.१४ कोटी वैद्यकीय सल्ले देण्यात आले.

नीती आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यांकन कार्यालयाने जुलै २०२४ मध्ये अंमलबजावणी आणि परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी एएएम कार्यक्रमाचे मूल्यांकन सुरू केले आहे. या अभ्यासात अनेक उत्साहवर्धक परिणाम अधोरेखित करण्यात आले, ज्यात पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा आणि व्यापक प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये सहज प्रवेशामुळे – विशेषतः एनसीडी व्यवस्थापन, सामान्य बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा , मोफत औषधे आणि निदान यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या तैनातीमुळे आघाडीच्या सेवा वितरणाला बळकटी मिळाली आहे आणि ई-संजीवनीसारख्या डिजिटल साधनांमुळे तज्ज्ञांच्या सेवांचा विस्तार वाढला आहे. मात्र संपूर्ण-सेवा पॅकेजेसची जागरूकता आणि वापर वाढवण्यासाठी मनुष्यबळ उपलब्धता आणि कौशल्य-आधारित प्रशिक्षण, औषधे आणि निदानांची सातत्यपूर्ण उपलब्धता, डिजिटल आंतर -परिचालन क्षमता आणि डेटा-संचालित नियोजन, आंतरविभागीय समन्वय आणि अधिकाधिक समुदाय सहभाग या बाबी आणखी भक्कम करण्याची शिफारस केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध आरोग्य कार्यक्रमांच्या कामगिरीवर नियमितपणे देखरेख ठेवली जाते, ज्यामध्ये आढावा बैठका, प्रमुख कामगिरीचा मध्यावधी आढावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय भेटी, सेवा वितरणासाठी मापदंड स्थापित करून कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कृत करणे इत्यादींचा समावेश आहे. तसेच, योजनेअंतर्गत प्रगती आणि अंमलबजावणी स्थितीचे मूल्यांकन आणि देखरेखीसाठी दरवर्षी सामायिक आढावा मोहीम आयोजित केली जाते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech