बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची करू नका, बावनकुळेंचे काँग्रेसला जाहीर आवाहन

0

अजित दादांची सावली आता बारामतीची माऊली

बारामती : महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. अजितदादांनी आपल्या राजकीय जीवनातील ८० टक्के काळ ज्यांच्यासोबत काम केले, त्या काँग्रेस नेत्यांना माझी विनंती आहे की, या जागेवर निवडणूक लढवून तुम्ही दादांच्या स्मृतींचा अनादर करू नका. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. काॅंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची करू नये. जर तुम्ही जनभावनेचा अनादर केला, तर बारामतीकर तुमचा असा दारूण पराभव करतील जो इतिहासात कधी झाला नसेल,” असा इशारा भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला दिला आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि महायुतीचे इतर मान्यवर नेते उपस्थित होते. “ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी आणि बारामतीच्या विकासासाठी झोकून दिलं, त्या लाडक्या अजितदादांची उणीव आज पावलापावलावर भासत आहे. मात्र, दादांनी पाहिलेली स्वप्नं आणि त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी दादांची सावली आणि आता बारामतीची ‘माऊली’ सुनेत्रा वहिनी खंबीरपणे उभ्या आहेत,” अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बावनकुळे म्हणाले की, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे, पण तितकाच मनावर दडपण आणणाराही आहे. महाराष्ट्राचे लोकनेते आणि ‘विकास पुरुष’ अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत असा एकही कानाकोपरा नाही जिथे दादांच्या कार्याचा ठसा नाही. शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा अजितदादांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे.”

सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, “माझे दादांशी ३२ वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात असताना, सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या १४ कोटी जनतेसाठी आणि दादांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्या केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर अजितदादांच्या सावलीतून बाहेर पडून आता बारामतीकरांच्या ‘माऊली’ म्हणून खंबीरपणे उभ्या आहेत. विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडायला सुरुवात केली आहे.”

बारामतीचा विजय ऐतिहासिक ठरणार
बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा हा विजय महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय असेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech