बीड : मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष आण्णा देशमुख यांच्या निर्घृण हत्येला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमास भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून स्व. संतोष देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले. तसेच त्यांचे बंधू धनंजय देशमुख, विराज, वैभवी व कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत असताना देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही अधिकचा अवधी लागत आहे, आम्ही सर्वजण न्याय मिळेपर्यत शांत बसणार नाहीत, असा विश्वास देशमुख कुटुंबासह समाजाला दिला.
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली, तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मात्र जोपर्यंत या नराधमांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत सरपंचांना न्याय मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया बंधु धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
वडिलांच्या हत्येला १ वर्ष झाले तरी आजही आम्ही न्यायाच्या अपेक्षेत आहोत. आरोपी आहेत, सर्व पुरावे आहेत तरीही या खटल्यात उशिर का होत आहे? हे समजत नाही. आमची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. समाजाने दिलेली साथ यामुळेच हा लढा उभा राहिला. आठवणींना कोणताही दिवस नसतो. मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन, पण ते माझ्यासोबत नसतील, याचं वाईट वाटतं. असं म्हणत मुलगी वैभवी देशमुखलाही अश्रु अनावर झाले.