कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिराच्या नुतनीकरणाचे भुमीपूजन आणि डोंबिवली (पूर्व) भुखंड क्र.४९ या सुविधा भुखंडावर प्रेरणा वॉर मेमोरिअल उभारणे या कामाचे लोकार्पण शनिवार दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
डोंबिवली या सांस्कृतिक नगरीतील सावित्रीबाई फुले नाटयगृह हे सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाकरिता अत्यंत महत्त्वाचे सभागृह आहे. तथापि या नाटयगृहाच्या मुख्य सभागृहाच्या छताचा काही भाग कोसळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दि.२४ मे २०२५ पासून हे नाटयगृह बंद ठेवण्यात आले होते आणि त्याचे संरचनात्मक ऑडिट करुन घेतले असता संपूर्ण इमारतीची मोठया प्रमाणावर दुरुस्ती व नुतनीकरणाची आवश्यकता होती त्यामुळे सदर कामासाठी राज्य शासन स्तरावरुन पहिल्या टप्प्यात रु. १५ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

यामध्ये संपूर्ण सभागृहाचे आंतरिक विदयुतीकरण (प्रेक्षागृह,सामायिक मार्ग, रुम्स, अदयावत वॉशरुमसह विदयुत व्यवस्था) ऑडिटोरिअम, साऊंड सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीमसह फायर पब्लिक ॲड्रेस सिस्टीम तसेच मुख्य छताचे नुतनीकरण ॲकॉस्टीक पॅनेलिंग, फॉलसिलिंग, ग्रीन रुम, व्हीआयपी रुमचे नुतनीकरण, प्रेक्षागृहातील खुर्च्या, कारपेट बसविणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. सदर काम ६ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून या प्रकल्पासाठी शासन स्तरावर निधी व प्रशासकिय मान्यता प्राप्त झाली आहे.
“प्रेरणा वॉर मेमोरिअल” हे स्मारक कडोंमपा आणि पद्मश्री गजानन माने यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला प्रकल्प आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, वास्तुशिल्पीय दृष्टीकोन आणि पर्यावरणस्नेही दृष्टी ठेऊन प्रत्येक घटकाची काळजीपूर्वक उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये तीन्ही सैन्यादलाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये सन १९९३ मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या युध्दनौका INS विनाशची प्रतिकृती, जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक अशा ब्राम्होस या क्षेपणास्त्राची प्रतिकृती, १९९९ च्या युध्दात वापरण्यात आलेले – भारताने विकसित केलेले चपळ, अत्याधुनिक बहुउद्देशिय लढाऊ विमान (जेट फायटर) तेजसची प्रतिकृती, १९ व्या शतकात युध्दात निर्णायक भुमिका बजावणा-या तोफेची प्रतिकृती त्याप्रमाणे भुदल, नौदल, वायुदलातील स्त्री व पुरुष सैनिकांच्या प्रतिकृती या मेमोरिअलमध्ये साकारण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील हे पहिले वॉर मेमोरिअल डोंबिवली येथे उभारण्यात आले असून प्रेरणा या नावाला साजेशी, शौर्य आणि त्यागाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणारे विचार प्रवर्तक आणि भावनिक अनुभूती देणारे असे हे स्मारक असून देशातील तरुणांना, सैनिक होण्यासाठी प्रेरणा देणारे आणि नागरिकांना आपल्या देशाप्रती योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणारे हे स्मारक असेल.