मुंबई महापौरपदी भाजपच्या रितू तावडे, उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड !
मुंबई : राज्यातीलच नव्हे आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यासोबतच उपमहापौरपदी शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही निवडी या सव्वा वर्षांसाठी असणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी खुले असून ११ फेब्रुवारीला ही निवड होणार आहे.
रितू तावडे या घाटकोपरमधील असून त्या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक १३२ मधून विजय मिळवला असून त्यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा आहेत. रितू तावडे यांचा मतदारसंघ गुजराती बहुल आहे, जिथे त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. सध्या त्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत.
निवडीनंतर पत्रकारांशी बोलतांना रितू तावडे म्हणाल्या, ‘‘मुंबईच्या महापौरपदी निवड झाली असली, तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. सभागृहाची गरिमा ठेवून सर्वांनी मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरून निर्मळ आणि प्रामाणिक काम करावे अशी माझी अपेक्षा आहे.’’ संजय घाडी यांनी प्रथम १९८८ ला शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख काम सुरू केले. यानंतर ते वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या, तर मुलगा सुयश युवासेना विधानसभा क्षेत्र समन्वयक आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांचे अंतिम बलाबल पुढीलप्रमाणे – भाजप ८९, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६५, शिवसेना २९, काँग्रेस २४, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, समाजवादी पक्ष २, एम्.आय.एम्. ८, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.