जयपूर : भारतात सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या काहो दिवसांमध्ये युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच सध्या भारतात इंडियन प्रीमियम लीग स्पर्धा सुरु आहे.त्यामुळे आयपीएलमध्येही सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.पण नुकतीच अशी माहिती मिळाली आहे की जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. हे स्टेडियम राजस्थान रॉयल्स संघाचे घरचे मैदान आहे.
बॉम्बची धमकी मिळाल्याची पुष्टी राजस्थान स्पोर्ट्स काऊन्सिलने केली आहे. ही धमकी ईमेलद्वारे सकाळी सव्वानऊच्या सुमारा देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. ईमेलमध्ये ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत म्हटले होते की,’आम्ही तुमच्या स्टेडियमवर बॉम्बस्फोट करू.’ दरम्यान, हा धमकीचा ईमेल राजस्थानच्या पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. राजस्थान स्पोर्ट्स काऊन्सिल अध्यक्ष नीरज के पवन यांनी सांगितले आहे की ‘आम्हाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. हा ईमल पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आला असून बॉम्ब निकामी करणारे पथक आणि तपासणी पथक येथे पोहचले आहेत. तपास सुरू असून स्टेडियम पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.
दरम्यान, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर अद्याप एक सामना होणे बाकी आहे. हा सामना १६ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे.आयपीएल २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील आता १७ सामनेच बाकी आहेत. १८ मेपर्यंत साखळी फेरीचे ७० सामने पूर्ण होणार आहेत. त्यानंतर २० मे पासून प्लेऑफला सुरुवात होणार आहे.२५ मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, पहलगाममध्ये एप्रिलच्या अखेरीस झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली. ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली होती.