अमृतसर : पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एलओसीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.हा जवान आज, बुधवारी मायदेशी परत आला आहे.अटारी बॉर्डरवर पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ यांचा ताबा भारताकडे सोपविला आहे.
बीएसएफने निवेदनाद्वारे सदर माहिती दिली आहे. “पाकिस्तानी रेंजर्सनी २३ एप्रिल २०२५ रोजी ताब्यात घेतलेल्या जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या स्वाधीन केले आहे. अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे आज सकाळी १०.३० वाजता त्यांना सोडण्यात आले. बीएसएफ जवानाचे हस्तांतर अतिशय शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार पार पडले.”
४० वर्षीय पूर्णम शॉ यांनी २३ एप्रिल रोजी शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडली होती. पूर्णम शॉ अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले, असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. तब्बल २० दिवसांनी त्यांची आज सुटका झाली आहे. शॉ हे पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात आहेत.