बुंद से गयी वो हौद से नही आती… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

पुणे : हिंदुत्त्वाचे राजकारण करणे ही आमची चूक होती’ असे वक्तव्य विधानसभेत जाहीररित्या करणाऱ्याना जनता अजून विसरलेली नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. पुणे जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या पुरंदर येथील पालखी मैदानावर शिवसेनेची दुसरी आभार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. काही जण आम्ही हिंदुत्त्व सोडले नाही सांगत आहेत मात्र त्यांच्याच प्रचार रॅलीमध्ये आतंकवादी फिरत होते, पाकिस्तानचे झेंडे मिरवले जात होते त्यामुळे बुंद से गयी वो हौद से नही आती.. असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरचा अवघड गड सर केल्याबद्दल तमाम शिवसैनिक आणि मतदारांचे जाहीर आभार मानले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आलो तेव्हा पुरंदरचा किल्लेदार हा विजयबापू शिवतारे हाच असेल असे मी तुम्हाला जाहीररीत्या सांगितले होते. तसे झाले तर गुलाल उधळायला नक्की येईन असेही मी म्हणालो होतो. मात्र आज या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीला ठामपणे उभे राहिल्याबद्दल लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी, तरुण,तरुणी, ज्येष्ठ यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. विजयबापू हेच पुरंदरचे किल्लेदार असून त्यांच्या हातून या भागाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

विजयबापू हे खंदे शिवसैनिक आहेत.बाहेरून फणसासारखे कडक पण आतून गऱ्यासारखे मऊ असा त्यांचा स्वभाव आहे. अनेकदा ते पटकन चिडतात मात्र तेवढ्याच लवकर त्यांचा राग शांत होतो. एकदा त्यानी एखादी गोष्ट मनात आणली तर ते ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. मात्र राजकारणात कायम श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. आम्ही देखील सुरुवातीची अडीच वर्षे श्रद्धा आणि सबुरी बाळगून काम केले. या दोन्ही गोष्टी सोबत ठेवल्या की मिळणारे फळ गोड असते. भरतशेठ गोगावले हे त्यांचे उदाहरण असल्याचे सांगितले.

गेली अडीच वर्षे अमच्यावर दररोज टीका करण्यात येत होती. पण मी ठरवले होते की टीकेचे उत्तर कामातून द्यायचे, गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर आमचे 60 आमदार निवडून आले. तर घरी बसून टीका करणाऱ्यांना जनतेने कायमचे घरी बसवले. लाडक्या बहिणींच्या योजनेलाही विरोध झाला मात्र आम्ही ती योजना राबवून सर्वसामान्य महिलांना न्याय दिला. विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राखायचे आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी अभियानाला तत्काळ गती द्यावी असे सांगितले. आमदार, खासदार यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष द्यावे या तालुक्यातील जेजुरी आणि सासवड दोन्ही नगर परिषदेच्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.

या मतदारसंघाने आपल्याला भरभरून यश दिले आहे, त्यामुळे पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांसशी संवाद साधून मार्ग काढणे, कारा नीरा नदीजोड प्रकल्प राबवणे, याभागात नवीन आयटी पार्कची निर्मिती करणे, विस्तारित पाणीपुरवठा योजना राबवणे यासारख्या कामांना प्राधान्य देऊन ती नक्की पूर्ण केली जातील असेही जाहीर केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, नाना भानगिरे, रमेश कोंढे, बाळासाहेब पालेकर, बाळासाहेब खांदेरे इरफान रावेतकर, ममताताई शिवतारे, भगवान पोखरकर, अतुल म्हस्के, विकास रेपाळे आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech