नवी दिल्ली : भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम १८ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.नवी दिल्ली आणि इस्लामाबादचे डीजीएमओ चर्चा झाली असून आता १८ मे पर्यंत सीमारेषवर गोळीबार न करणे किंवा लष्करी कारवाई न करणे याबाबत दोन्ही देशात सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही देशांमधील सध्याचा युद्धबंदी करार १८ मे पर्यंत लागू राहील, त्यानंतर त्याच दिवशी दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे विदेश मंत्री इशाक दर यांनी सांगितले की, पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दूला व भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजिव घई यांच्यात हॉटलाईन वर युद्धविरामाबाबात गुरुवारी (दि.१५)चर्चा झाली व त्यात १८ मे पर्यंत सिझफायर थांबवण्याचा निर्णय झाला. या चर्चेदरम्यान नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवणे, तणाव कमी करणे या संदर्भात चर्चा झाली.दार यांनी संसदेत पुढे नमूद केले की, पुढील चर्चेसाठी डीजीएमओ १८ मे रोजी पुन्हा संपर्क साधतील अशी अपेक्षा आहे.तत्पूर्वी १२ मे ला झालेल्या दोन्ही देशांच्या डीजीएमओ च्या चर्चेनंतर १४ मे पर्यंत युद्ध विराम कायम ठेवण्यात आला होता.आता आता पाकिस्तान ने १८ मे पर्यंत हा युद्ध विराम वाढवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं.
दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये १० मे रोजी युद्धविरामाची चर्चा झाली होती. यानुसार सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अतिदक्षता पातळी कमी करणे, पाकिस्तानी लष्कराकडून हल्ले थांबविणे आदींवर सहतमी बनली होती. यानंतर पुन्हा १२ मे रोजी चर्चा झाली. यावेळी सामंजस्य करारानुसार सैन्याची सतर्कतेची पातळी कमी करणे आणि दोन्ही देशांदरम्यान विश्वास निर्माण करण्याचे उपाय सुरु ठेवण्यावर चर्चा झाली होती.
भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस मिसाईल आणि ड्रोन हल्ले सुरु होते. भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ तर उध्वस्त केलेच परंतू १३ पैकी ११ एअरबेसनाही नुकसान पोहोचविले होते. एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. यामुळे नामोहरम झालेल्या पाकिस्तानने अखेर १० तारखेला दुपारी साडेतीन वाजता भारताला फोन फिरविला व हल्ले थांबविण्याची विनंती केली. भारताने ती मान्य करत यापुढे पाकव्याप्त काश्मीरवरच पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकते अशी अट ठेवली आहे.
भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या इस्लामाबादनेही आता शांती हवी असल्याचा जप करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी (दि.१५) भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताने पाणी सोडण्याचीही विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. परंतू, भारताने ती फेटाळली आहे.