एलपीजी टंचाईमुळे रेल्वे स्थानकांवरील कॅटरिंग सेवेत बदल

0

नवी दिल्ली : आखातातील तणावपूर्ण परिस्थिती आणि इराण-अमेरिका तसेच इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेतून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद आता देशातही उमटू लागले आहेत. ऊर्जा पुरवठा खंडित झाल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. या परिस्थितीचा परिणाम रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल चालकांवरही होत आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे स्टेशन परिसरातील स्टॉल्स, फूड प्लाझा आणि इतर केटरिंग युनिट्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने कॅटरिंग ऑपरेटर्स आणि स्टॉल चालकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या देशात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांवर परिणाम होऊ नये, यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आयआरसीटीसीच्या नव्या सूचनेनुसार, गॅसच्या संभाव्य कमतरतेची भरपाई करण्यासाठी स्टेशनवरील केटरिंग ऑपरेटर्सना मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कुकर यांसारख्या विद्युत उपकरणांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी रेडी-टू-ईट खाद्यपदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांवरील खाद्यसेवा अखंडित राहावी आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू नये, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे की हे निर्देश ट्रेनमधील केटरिंग सेवांसाठी नसून केवळ रेल्वे स्थानकांवर असलेल्या दुकाने आणि केटरिंग युनिट्ससाठी लागू आहेत. नव्या नियमानुसार गॅस टंचाईमुळे स्टेशनवरील स्टॉल्सना त्यांच्या कामकाजात बदल करावे लागतील. एलपीजी उपलब्ध नसल्यास मायक्रोवेव्ह किंवा इंडक्शन कुकिंगसारखे पर्याय तातडीने स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही केटरिंग युनिटमध्ये गॅसवर स्वयंपाक पूर्णपणे बंद करावा लागल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम रेल्वे स्थानकांवरील सर्व फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि ‘जन आहार’ आउटलेटसाठी लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, ट्रेनमधील पॅन्ट्री कारमध्ये प्रामुख्याने केवळ अन्न गरम करून प्रवाशांना वितरित केले जाते आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथे एलपीजी सिलिंडर ठेवले जात नाहीत. मात्र स्टेशनवरील बेस किचनमध्ये एलपीजीच्या कमतरतेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अन्न तयार करणे कठीण होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही गाड्यांमध्ये शिजवलेल्या जेवणाची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा पर्याय रेल्वे प्रशासन विचाराधीन ठेवत आहे. ज्या प्रवाशांनी तिकीट बुक करताना आधीच जेवणासाठी पैसे भरले आहेत, त्यांना परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचीही तयारी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील खाद्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी आयआरसीटीसीकडून करण्यात आलेली ही तात्पुरती उपाययोजना मानली जात असून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे व्यवस्था सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५ मार्च रोजी अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर काही निर्बंध लागू केले आहेत. गॅस सिलिंडर मिळण्यात विलंब होत असल्याने आणि भविष्यात आणखी टंचाई निर्माण होण्याच्या भीतीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस वितरण केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech