नवी दिल्ली : देशाचे निवर्तमान सरन्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी निवृत्तीनंतर कोणतेही अधिकृत पद भूषवणार नसल्याची घोषणा केली. परंतु कायद्याच्या क्षेत्रात त्यांचे काम सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. न्या. खन्ना यांची ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा आज, मंगळवारी (लास्ट वर्किंग-डे) कामकाजाचा अखेरचा दिवस होता.
यावेळी निरोपाच्या भाषणात, सरन्यायमूर्ती म्हणाले की, कायदेशीर व्यवसायात सत्याचा अभाव त्यांना अस्वस्थ करतो. सरन्यायमूर्तीपद म्हणजे न्यायालयावर वर्चस्व गाजवणे किंवा शरण जाणे नव्हे. निवृत्तीनंतर मी कोणतेही पद स्वीकारणार नाही. कदाचित मी कायद्याच्या क्षेत्रात काहीतरी करेन. कायद्याशी संबंधित काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. निवृत्ती ही एका नवीन आयुष्याची सुरुवात वाटते. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची अधिकृतपणे शिफारस केली होती. त्यांचे नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. यासह, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायमूर्ती असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, बुधवारी १४ मे रोजी न्या. गवई यांना सरन्यायमूर्तीपदाची शपथ देणार आहे.