द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले गैरहजेरीवर आश्चर्य
कोलकाता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, शनिवारी आदिवासी समुदायाच्या वर्षिक कार्यक्रमासाठी पश्चिम बंगाल दौऱ्यावर होत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज, शनिवारी राष्ट्रपतींच्या औपचारिक स्वागताकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल सरकारमधील इतर मंत्री देखील राष्ट्रपतींच्या स्वागताला अनुपस्थित होते. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती म्हणाल्या की ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत. तसेच ममतांच्या अनुपस्थितीवर आश्चर्य व्यक्त केले.
राष्ट्रपती पश्चिम बंगालच्या बागडोगरा विमानतळाजवळील गोशाईपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सिलीगुडी जवळील बिधाननगर येथे आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री नाराज असल्याचा उल्लेख केला. राष्ट्रपती म्हणाल्या की, “ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत. मी देखील बंगालची मुलगी आहे. त्या नाराज आहेत की नाही हे मला माहित नाही.” तसेच त्यांनी आदिवासी समुदायाच्या वार्षिक कार्यक्रमाचे ठिकाण बिधाननगरवरून गोशाईपूर येथे का बदलण्यात आले याबद्दलही मुर्मू यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, नवीन ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी लोक उपस्थित होते.
हा कार्यक्रम आधी सिलीगुडीच्या बिधाननगर येथे होणार होता. मात्र अधिकाऱ्यांनी सुरक्षा आणि इतर लॉजिस्टिक कारणांचा हवाला देत कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोपालपूर येथे हलवले. राष्ट्रपती तेथे पोहोचल्या तेव्हा महापौर गौतम देव हेच विमानतळावर त्यांचे स्वागत करणारे एकमेव प्रतिनिधी होते. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी साधारणपणे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारमधील एखादा मंत्री उपस्थित असतो.दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पश्चिम बंगालमधील मतदार यादीतून नावे काढून टाकल्याच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही आपले धरणे आंदोलन सुरू ठेवले.