देश आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे – पंतप्रधान

0

अहमदाबाद : जनतेच्या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रती माझ्या समर्पणाला बळ दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे काही निर्णय घेतले आहेत, जे अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, दशकांच्या जुन्या बंधनांमधून मुक्त होत आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आज, देश निराशेच्या आणि अंधाराच्या युगातून आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गुजरातमधील दाहोद येथे २४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, २६ मे या दिवसाला विशेष महत्व आहे. कारण २०१४ मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या गुजरातच्या जनतेच्या अढळ पाठिंब्याचा आणि आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख केला.

“१४० कोटी भारतीय विकसित भारताच्या उभारणीसाठी एकत्र आले आहेत”, असे सांगत मोदी यांनी आवश्यक वस्तूंचे भारतातच उत्पादन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वयंपूर्ण बनणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. जागतिक निर्मिती क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत असूनदेशांतर्गत उत्पादन आणि निर्यात दोन्हीमध्ये सातत्याने वाढ होत आहे असे ते म्हणाले. भारत आता स्मार्टफोन, ऑटोमोबाईल्स, खेळणी, संरक्षण उपकरणे आणि औषधे यासह विविध उत्पादनांची निर्यात करत आहे. ते पुढे म्हणाले की भारत केवळ रेल्वे आणि मेट्रो तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही तर जागतिक स्तरावर त्याची निर्यातही करत आहे. या प्रगतीचे दाहोद हे प्रमुख उदाहरण आहे जिथे हजारो कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि प्रारंभ करण्यात आला असे सांगत मोदी यांनी दाहोद इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरी ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे अधोरेखित केले. तीन वर्षांपूर्वी त्यांनी याची पायाभरणी केल्याची आठवण करून दिली आणि पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आता यशस्वीरित्या तयार झाले आहे याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला, गुजरात आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. याचबरोबर त्यांनी घोषणा केली की गुजरातने आपल्या रेल्वे नेटवर्कचे १००% विद्युतीकरण साध्य केले आहे, हा एक उल्लेखनीय टप्पा असल्याचे नमूद करत त्यांनी या कामगिरीबद्दल गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले.

दाहोदशी असलेले आपले दीर्घकालीन नाते आणि या प्रदेशाशी निगडित अनेक आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी सांगितले की ते गेल्या अनेक दशकांपासून दाहोदला भेट देत आहेत आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते अनेकदा सायकलवरून या भागात फिरले आहेत. या अनुभवांमुळे त्यांना दाहोदची आव्हाने आणि क्षमता दोन्ही समजून घेता आल्या असे त्यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरही, त्यांनी या अनेकदा या भागाला भेट दिली आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी निर्णायक पावले उचलली. दाहोदमधील प्रत्येक विकास कार्य त्यांना प्रचंड समाधान देते आणि आज त्यांच्यासाठी आणखी एक अर्थपूर्ण दिवस आहे यावर त्यांनी भर दिला.

गेल्या १०-११ वर्षात भारताच्या रेल्वे क्षेत्राच्या जलद विकासावर प्रकाश टाकताना मोदी यांनी मेट्रो सेवांचा विस्तार आणि अर्ध द्रुतगती रेल्वेगाड्या सुरू करण्यावर भर दिला, ज्यामुळे देशभरातील संपर्कव्यवस्थेत बदल झाला. त्यांनी सांगितले की वंदे भारत ट्रेन आता जवळजवळ ७० मार्गांवर धावतात, ज्यामुळे भारताचे वाहतूक जाळे आणखी मजबूत होत आहे. त्यांनी अहमदाबाद आणि वेरावळ दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली.

मोदी पुढे म्हणाले की, भारतात आधुनिक गाड्यांचा उदय हा देशातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झाला आहे. त्यांनी यावर भर दिला की डबे आणि इंजिने आता देशामध्येच तयार होतात, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होते. “भारत रेल्वे उपकरणांचा आघाडीचा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे”, असे मोदी म्हणाले, भारत ऑस्ट्रेलियाला मेट्रो डबे तसेच इंग्लंड, सौदी अरेबिया आणि फ्रान्सला रेल्वे डबे निर्यात करतो. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दळणवळणाच्या सुविधा वाढवण्याच्या आणि जागतिक दर्जाच्या प्रवासी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी दाहोद येथे भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. यातून देशांतर्गत तसेच निर्यात करण्यासाठी 9000 एचपी क्षमतेचे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह तयार केले जातील. त्यांनी प्रकल्पातून उत्पादित केलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला.या गाड्या भारतीय रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढविण्यास मदत करतील.या गाड्या रीजनरेटीव्ह ब्रेकिंग सिस्टमने सुसज्ज असतील आणि ऊर्जा वापर कमी करण्यासाठी डिझाइन केले जात आहेत, ज्यामुळे पर्यावरणीय सुरक्षेला हातभार लागेल.

त्यानंतर, पंतप्रधानांनी दाहोदमध्ये २४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे आणि गुजरात सरकारच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे.यावेळी त्यांनी वेरावळ आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आणि वलसाड आणि दाहोद स्थानकांदरम्यान जलद गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech