प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0

मुंबई : अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना‘शिव -शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगतानाच दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल असेही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहिन तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू असा शब्दही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, असा संकल्प सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन असाही शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech