मुंबई : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी त्या काळात प्रचलित असलेला साम्यवाद व भांडवलशाही यांच्या सुवर्णमध्य साधत एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडला होता. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर स्वामी विवेकानंद व महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. दीनदयाल उपाध्याय यांचे विचार विद्यार्थी व युवकांमध्ये पोहोचवल्यास ते देशभक्त नागरिक होतील व विकसित भारताचे लक्ष्य वास्तवात येईल असे सांगून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात दीनदयाल उपाध्याय अध्यासन स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई येथे केली.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयात दिनांक २२ ते २५ एप्रिल १९६५ येथे एकात्म मानवतावाद या विषयावर व्याख्याने दिली होती. त्या व्याख्यानमालेच्या हिरक महोत्सवानिमित्त रुईया महाविद्यालय येथे आयोजित चर्चासत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. चर्चासत्राचे आयोजन दीनदयाल शोध संस्थान व लोढा फाउंडेशन यांनी केले होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या उपाध्याय यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत असे सांगून ग्रामीण भागात रस्ते, गरिबांना स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन, पेयजल या योजना त्याचाच परिपाक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
करोना काळात पाश्चात्य देशांनी लस शोधली असती तर तिची किंमत जनतेच्या आवाक्यात राहिली नसती असे सांगून भारताने संपूर्ण देशवासियांना मोफत लसी दिली व त्याहीपलीकडे जाऊन अनेक देशांना मोफत करोना प्रतिबंधक लस मोफत दिली हा समावेशक विचार पंतप्रधान मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याकडूनच अंगिकारला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. देशात अनेक लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही या वास्तवाचे भान ठेवून अन्न वाया जाऊ देऊ नये. तसेच प्रत्येकाने धन अर्जन करावे परंतु अनावश्यक खर्च करू नये व केवळ स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगावे हा दीनदयाल उपाध्याय यांचा विचार स्वीकारला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत सुरेश सोनी, दीनदयाल शोध संस्थांचे सरचिटणीस अतुल जैन, विविध विद्यापीठांचे कुलगुरु आणि इतर मान्यवर उपस्थित होते.