नवी दिल्ली : संरक्षण करारातील दिरंगाई मोठी समस्या असल्याची चिंता एअर चिफ मार्शन अमर प्रीत सिंग यांनी व्यक्त केली. सीआयआय बिझनेस समिट- २०२५ मध्ये संरक्षण तंत्रज्ञानाबद्दल भाष्य करताना ते आज, गुरुवारी बोलत होते. यावेळी एअर चीफ मार्शल म्हणाले की, अनेकदा, करारावर स्वाक्षरी करताना आपल्याला माहित असते की त्या गोष्टी कधीही वेळेवर येणार नाहीत. मुदती ही एक मोठी समस्या आहे आणि मला वाटते की एकही प्रकल्प त्याच्या नियोजित वेळेवर पूर्ण झालेला नाही. आपण असे वचन का द्यावे जे पूर्ण करता येत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच संरक्षण प्रणालींमध्ये विलंबाच्या अनेक प्रकरणांकडेही लक्ष वेधले, विशेषतः स्वदेशी प्रकल्पांशी संबंधित. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) कार्यक्रमाचा संदर्भ देत, हवाई दल प्रमुख म्हणाले की, तेजस एमके-१ ए लढाऊ विमानांची डिलिव्हरी अडकली आहे. ज्यावर फेब्रुवारी २०२१ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत करार करण्यात आला होता. ऑर्डर केलेल्या ८३ विमानांपैकी एकही विमान अद्याप डिलिव्हर झालेले नाही. सुरुवातीला मार्च २०१४ मध्ये ही डिलिव्हरी होणार होती.
या विलंबामुळे तेजस एमके-१ए फायटर जेटसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. सुमारे ३ वर्षांपूर्वी करार होऊनही जेट अद्याप डिलिव्हर झालेले नाहीत. एअर चीफ मार्शल म्हणाले की, तेजस एमके-१ ची डिलिव्हरी होण्यास विलंब होत आहे. तेजस एमके-२ चा प्रोटोटाइप अद्याप आणण्यात आलेला नाही. अद्याप स्टिल्थ एएमसीए फायटरचा कोणताही प्रोटोटाइप नसल्याचे त्यांनी सांगितले. हवाईदल प्रमुख दिरंगाईबद्दल भाष्य करीत असताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील शिखर परिषदेत उपस्थित होते. ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा हवाई दल स्वतः सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाला महत्त्व देत आहे.