सनातन धर्माचा नाश करणे सोपे नाही, तो सूर्य आणि चंद्राप्रमाणे अमर- अमित शाह

0

गांधीनगर : भारताचा सनातन धर्म, संस्कृती आणि लोकांची श्रद्धा नष्ट करणे सोपे नाही. सोमनाथ मंदिरावर हल्ले करणारे सर्वजण इतिहासाच्या पानात गायब झाले, मात्र मंदिर आजही त्याच जागेवर अभिमानाने उभे आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. अमित शाह सध्या गुजरात दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी गांधीनगरमध्ये २६७ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

अमित शाह म्हणाले, “१६ वेळा उद्ध्वस्त करूनही सोमनाथ मंदिर आज १,००० वर्षांनंतरही संपूर्ण अभिमान आणि सन्मानाने उभे आहे आणि त्याच्या शिखरावर धर्मध्वज फडकत आहे. हा संपूर्ण जगासाठी संदेश आहे की भारताचा सनातन धर्म, संस्कृती आणि लोकांची श्रद्धा नष्ट करणे अशक्य आहे. ती चंद्र आणि सूर्याप्रमाणे शाश्वत आणि अमर आहे. सोमनाथ मंदिर हे भारताच्या श्रद्धा, विश्वास आणि अभिमानाचे प्रतीक असल्याचे शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ जानेवारी रोजी सोमनाथ स्वाभिमान पर्वाची सुरुवात केली होती. महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या हल्ल्याला आणि त्यानंतर झालेल्या पुनर्बांधणीला १,००० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा उत्सव आयोजित केला जात आहे. महमूद गझनीने इ.स. १०२६ मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ मंदिराचा भव्य कॉरिडोर उभारण्यात येणार आहे. सोमनाथ स्वाभिमान पर्व संपूर्ण वर्षभर देशभरात साजरा केला जाणार असून, याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती केली जाणार आहे. शाह म्हणाले, “एक हजार वर्षांपूर्वी महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर अलाउद्दीन खिलजी, अहमद शाह, महमूद बेगडा आणि औरंगजेब यांसारख्या आक्रमकांनीही हल्ले केले. मात्र प्रत्येक हल्ल्यानंतर मंदिराची पुन्हा उभारणी झाली.

आक्रमकांना विध्वंसावर विश्वास होता, तर मंदिर उभारणाऱ्यांना सृजनावर विश्वास होता. आज हजार वर्षांनंतर आक्रमक नाहीसे झाले आहेत, पण सोमनाथ मंदिर आजही पूर्ण अभिमानाने उभे आहे. सोमनाथ मंदिरावर झालेला हल्ला हा केवळ एका मंदिरावर नव्हता, तर तो आपल्या श्रद्धा, विश्वास आणि आत्मसन्मानावरचा हल्ला होता. अशा हल्ल्याचे उत्तर दुसरा हल्ला असू शकत नाही; त्याचे उत्तर आत्मसन्मानात दडल्याचे त्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech