कर्ली नदी किनारा बंधाऱ्याचे भूमिपूजन
सिंधुदुर्ग : कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी बंधारा बांधण्याची गांवकऱ्यांची खूप दिवसांपासूनची मागणी होती. आज या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले आहे. या बंधाऱ्यासाठी 158 कोटी रुपयांचा निधी मजूंर करण्यात आलेला असून येत्या २४ महिन्यात या ठिकाणी दर्जेदार बंधारा तयार होणार आहे. यापुढेही देवबागच्या विकासाला माझे प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. देवबाग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कर्ली नदी किनारा बंधाऱ्याचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, तहसिलदार वर्षा झाल्टे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रकल्प संचालक महेश चांदुरकर, दत्ता सामंत, बाबा मोंडकर, संजय पडते, अशोक सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, शासन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहे. आशियाई विकास बँक पुरस्कृत ‘महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प’ अंतर्गत हा बंधारा बांधण्यात येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ हा बंधारा बांधणार आहे. दर तीन महिन्यांनी भेट देऊन जिल्ह्यातील प्रत्येक कामांची पाहणी करण्यात येणार असल्याने सर्व कामे दर्जेदार होणार आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळ बारकाईने लक्ष ठेवणार असल्याने बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट आणि दर्जेदार होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. आमदार निलेश राणे म्हणाले, या बंधाऱ्यामुळे गांवकऱ्यांचा पावसाळ्यात होणारा त्रास कमी हेाणार आहे. या भागाच्या विकासासाठी आमदार म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील आहे. या भागातील ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी पर्यायी रस्ता बांधण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.