‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामन्याबाबत प्रश्नचिन्ह?

0

शिमला : पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर धर्मशाळा विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.धर्मशाळा विमानतळ बंद केल्याने याचा परिणाम आयपीएल संघांच्या प्रवास वेळापत्रकावर झाला आहे. गुरुवार ८ मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. तर ११ मे रोजी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात धर्मशाळा येते सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मशाळा विमानतळ बंद केल्याने धर्मशाळा येथे होणारे आयपीएल सामने रद्द होणार का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

धर्मशाळा हे पंजाब किंग्ज संघाचं दुसरं घरचं मैदान आहे. सध्या पंजाब संघाला प्रवासासंदर्भात कोणतीही अडचण नाही, कारण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ या आठवड्याच्या शेवटपर्यंत तिथेच राहणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला मात्र पाहावं लागेल की त्यांचे खेळाडू परत कसे येणार, कारण त्यांना रविवारी (११ मे) अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सामना खेळायचा आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई संघाचं प्रवासाचं वेळापत्रकही अद्याप ठरलेलं नाही.तर “सध्या सर्व काही अनिश्चित आहे. संघांशी चर्चा सुरू आहे आणि तेही विचार करत आहेत की जर विमानतळ बंद राहिलं तर धर्मशाळेतून दिल्लीकडे परत कसं यायचं. दिल्ली कॅपिटल्ससाठी एक पर्याय म्हणजे बसने परत येणं, पण फक्त संघच नाही तर प्रसारणाची टीम आणि उपकरणंही आहेत.”विमानतळे बंद झाल्याने आयपीएल सामने रद्द होणार का? याबाबत सध्यातरी बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या कब्ज्यात असलेल्या काश्मीरमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर देशातील उत्तर आणि पश्चिम भागातील किमान १८ विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यामध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर यांचा समावेश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech