कल्याणातील आनंद दिघे पूलावरून शिवसेना – भाजप श्रेयवादाची लढाई
कल्याण : कल्याण शहरातील धर्मवीर आनंद दिघे पुलाचे उद्घाटन कोण करणार यावरून आज शिवसेना आणि भाजप मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. आज सकाळी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पुलाची पाहणी करून संध्याकाळी पूल खुला होणार असे सांगितले होते. भाजपकडून आज संध्याकाळी पाच वाजता पुलाचे अधिकृत उद्घाटन होणार होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने अचानक कृती करत पूल वाहतुकीसाठी खुला केल्याची घोषणा केली. त्यामुळे पूल आज दुपारीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
यावर शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली की, हे श्रेयासाठी केलेले काम नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूल तत्काळ सुरू केला असल्याचे विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड आणि शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, प्रमोद पिंगळे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.