बर्लिन : पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीवर भारत-पाकिस्तान युद्धविराम झाल्याचे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. जर्मनीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील विविध देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडत आहेत.याचदरम्यान, एस. जयशंकर जर्मनी दौऱ्यावर असताना, भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का..? असा प्रश्न एस. जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, युद्धविरामासाठी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये थेट संपर्क झाला होता. त्यातच युद्धविरामावर सहमती झाली होती. आम्ही पाकिस्तानचे मुख्य हवाई तळ आणि संरक्षण प्रणालींना प्रभावीपणे लक्ष्य केले होते. त्यामुळे युद्धविरामासाठी कोणाचे आभार मानावे ? मला वाटते की, भारतीय सैन्य. कारण भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळेच पाकिस्तानला असे म्हणण्यास भाग पाडले की, आम्ही लढाई थांबवण्यास तयार आहोत.
दरम्यान, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान जग अणुयुद्धापासून किती दूर होते? असाही प्रश्न एस. जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर, खरे सांगायचे तर, मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटते. आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही त्यांना दाखवून दिले की, आम्ही काय करू शकतो. आम्ही त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली. त्यांच्या मागणीवरून गोळीबार थांबवण्यात आला. परंतु या काळात कधीही अणुहल्ल्याची चर्चा झाली नाही असे त्यांनी सांगितले