अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अखेर डीएनए जुळले आहेत. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने आज (दि.१५) ११ वाजून १० मिनिटांनी दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव कुटुंबाला देण्यात आलं. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ३२ जणांचे डीएनए जुळले आहेत. तर १४ कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याचं पार्थिव दिलं आहे. अनेक मृतदेह भीषण जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डीएनए चाचणी करुनच ते त्यांच्या नातेवाईकांना दिले जात आहेत असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.
या अपघातातील मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे सुरक्षिततेसह त्यांच्या गावी नेले जात आहेत. यासाठी २३० रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज आहेत. अपघातात प्राण गमावलेल्या ११ परदेशी नागरिकांचे कुटुंबिय आज अहमदाबादला पोहोचू शकतात. मृतदेह ठेवण्यासाठी १७० शवपेट्या बनवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापैकी सुमारे १०० शवपेट्या वडोदराहून अहमदाबादला आणण्यात आल्या आहेत. उर्वरित शवपेट्या बनवण्याचे काम सुरू आहे.
एअर इंडियाच्या एआय १७१ या विमानाच्या अपघाताने देशभरात खळबळ उडाली आहे. अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे हे एआय १७१ विमान होते. प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश होता. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झाला आहे. विजय रुपाणी हे लंडनला त्यांच्या मुलाला आणि पत्नीला भेटण्यासाठी जात होते. मात्र या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या २७५ वर पोहोचली आहे.