नवी दिल्ली : राज्यसभेत उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर पंजाबमधील राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांनी आज प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्ष नेतृत्वाने गुरुवारी त्यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले होते. तसेच राज्यसभा सचिवालयालाही पत्र देऊन पक्षाच्या कोट्यातून राघव चड्ढा यांना बोलण्याचा वेळ देऊ नये, असे कळवण्यात आले होते. आज, शुक्रवारी सकाळी आपल्या एक्स हँडलवर व्हिडिओ जारी करत राघव चड्ढा म्हणाले, “ज्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना सांगू इच्छितो की माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी असा दरिया आहे जो योग्य वेळी महापुरात बदलतो.” ते पुढे म्हणाले की, “मी असे मुद्दे मांडतो जे सहसा संसदेत उपस्थित केले जात नाहीत. पण जनतेचे प्रश्न मांडणे हा काही गुन्हा आहे का? हा प्रश्न मी त्यामुळे विचारत आहे कारण आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला मला संसदेत बोलण्याची संधी देऊ नये, असे सांगितले आहे.”
राघव चड्ढा पुढे म्हणाले, “माझ्या बोलण्यावर बंदी का घालायची? मी जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य माणसाच्या प्रश्नांवरच बोलतो. जोमॅटो आणि ब्लिंकिटच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, टोलचा मुद्दा, बँकांचे शुल्क, तसेच टेलिकॉम कंपन्या वारंवार रिचार्जच्या नावाखाली पैसे कसे घेतात, हे मुद्दे मी सभागृहात मांडले. या सर्व मुद्द्यांमुळे देशातील सामान्य माणसाला फायदा झाला, मग आम आदमी पक्षाचे त्यातून नुकसान कसे झाले? मग मला बोलण्यापासून का रोखले जात आहे?” ते म्हणाले, “तुम्ही मला अमर्याद प्रेम देता. मी हे मुद्दे मांडतो तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद आणि पाठिंबा देता. असेच माझा हात धरून ठेवा.” शेवटी त्यांनी पुन्हा म्हटले, “ज्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना सांगू इच्छितो की माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी असा दरिया आहे जो योग्य वेळी महापुरात बदलतो.”