वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता टॅरिफच्या सध्या सुरू असलेल्या मुद्द्यात चित्रपट उद्योगाचाही समावेश केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर १०० टक्के कर लादला आहे. याचा थेट परिणाम हॉलिवूडवर होऊ शकतो. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करून मोठी माहिती दिली.
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ”अमेरिकेतील चित्रपट उद्योग खूप वेगाने मरत आहे. इतर देश आपल्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओना अमेरिकेपासून दूर नेण्यासाठी विविध प्रोत्साहन योजना देत आहेत. हॉलिवूड आणि अमेरिकेतील इतर अनेक क्षेत्रे उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर देशांचा सुनियोजित प्रयत्न आहे आणि म्हणूनच तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.” असे म्हटले आहे.या शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी, “मी वाणिज्य विभाग आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधींना परदेशात उत्पादित आणि आपल्या देशात आयात केलेल्या सर्व चित्रपटांवर १००% शुल्क लादण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे अधिकार देतो.” आम्हाला पुन्हा अमेरिकेत चित्रपट बनवायचे आहेत!” असे सांगितले आहे.
ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफ निर्णयाचा थेट परिणाम हॉलिवूडवर होणार आहे. हॉलिवूडमध्ये बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांना आता जास्त खर्च करावा लागू शकतो. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की परदेशात बनणाऱ्या चित्रपटांमुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे.