लोणी : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रयत्नांमुळे पुढील चार वर्षात या देशातील दुष्काळ संपुष्टात आलेला असेल. कारण पाण्याच्या योजनांसाठी मोदींनी जेवढा निधी दिला तेवढा यापुर्वी कोणीही दिला नव्हता. संपूर्ण देशात जलसिंचनाच्या योजनांची मोठी कामे सुरु आहेत. प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पुर्ण करुन दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी सर्वांना एकत्रिपणे काम करावे लागेल, राज्यातील योजनांसाठी शक्य तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याची आमची तयारी आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोर केंद्रीय मंत्री सी.आर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने राज्यातील नदीजोड प्रकल्पांचे आणि इतर जलसिंचन प्रकल्पांचे सादरीकरण जलसंपदा विभागाच्या वतीने मंत्र्यांसमोर करण्यात आले. पंधरवड्यामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या अभियंत्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला.
जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, अप्पर मुख्य सचिव दिपक कपूर, आ.किरण लहामटे, आ.मोनीका राजळे, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, आ.काशिनाथ दाते, आ.विक्रमसिंह पाचपुते, सचिव संजय बेलसरे, गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, कृष्णा खो-याचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जिल्हाधिकारी डॉ.पंकज अशिया, मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, मेरीचे महासंचालक अभय पाठक, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील यांच्यासह विभागाचे सर्व आधिकारी आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री सी.आर पाटील म्हणाले की, सरकारी आधिकारी चांगले काम करतात, असे कोणी म्हणत नाही. परंतू आत्ताच मला समजले की, महाराष्ट्रामध्ये आधिका-यांसाठी विनम्रता सप्ताह राबविला जातो. सात दिवस चांगले काम करण्याचा संदेश या सप्ताहाचा असतो. परंतू यामध्ये आता बदल करावा लागेल. कारण आपण सदैव लोकांसाठी काम करणा-या व्यवस्थेचे घटक आहोत. लोकांसाठी आपल्याला काम करायचे आहे. आपला विभाग तर, पाण्याशी जोडलेला आहे. पाणी देणे हे माझ्या दृष्टीने सेवेचे काम आहे. आपल्याला ते निष्ठेने करावे लागेल. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात पाण्यासाठी जागृती निर्माण करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या देशात शेतक-यांनी अनेक पुर पाहीले पण आता पाणी बाटलीत बंद झाले आहे. बाटलीतील राहीलेले अर्धेपाणी सुध्दा आपल्यासाठी खुप महत्वाचे आहे. कारण भविष्यात घरामध्ये आलेल्या पाहुण्याला पाण्याची कॅप्सूल देण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पाणी वाचविणे हेच आपले ध्येय काम करताना ठेवा असा संदेश देवून देशामध्ये जलसिंचनाच्या प्रकल्पांचे सर्वाधिक कामे सुरु आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी संवेदनशिलतेने निर्णय घेत आहेत.
‘जल है तो कल है, आणि कॅच द रेन’ यासाठी मागील वर्षात केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळेच अनेक राज्यांमध्ये सिंचनाचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात तर सर्वाधिक जलप्रकल्प आहेत. काहींची कामे सुरु आहेत. मात्र वेळेत काम झाले नाही तर, त्याची खुप किंमत वाढते याचा विचार आपण करीत नाही. त्यामुळे आता गावातील पाणी गावातच आणि शेतातील पाणी शेतातच जिरविण्या शिवाय पर्याय नाही. पाण्याचा योग्य जलसंचय करण्यासाठी लोकांनी आता पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शेतामधील सिंचन वाढवायचे असेल तर, शोष खड्यांसारखी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु केली आहे. यासाठी सेवाभावी संस्था आणि कार्पोरेट कंपन्या सिएसआर फंड उपलब्ध करुन देत आहे. आमचा विभाग फक्त योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम करीत आहे. आपल्या भागातही आपण एक हजार शेतकरी गोळा करा, या योजनेची सुरुवात करण्यासाठी माझे पुर्ण सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कोणत्याही विभागाची प्रतिमा ही आधिका-यांच्या कामावर अवलंबून असते. जलव्यवस्थापन पंधरवड्यात सर्वांनी केलेल्या चांगल्या कामाबाबत त्यांनी आधिका-यांचे अभिनंदन करुन, या पंधरा दिवसात आलेल्या सुचना हा आपल्या विभागाचा धोरणात्मक पाया ठरले असा विश्वास व्यक्त करुन, समाजाप्रती बांधिलकी महत्वाची असते. आपण शेतक-यांसाठी काम करीत आहोत ही जाणीव तुम्ही ठेवली तर, अधिकचे चांगले काम जल व्यवस्थापनामध्ये होवू शकेले.
नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार असून, भविष्यात याचा सर्वांनाच फायदा होईल. महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले काम अशाच पध्दतीने आपल्याला पुढे घेवून जावे लागेल. आधिका-यांनी जबाबदारीने काम करावे, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माझ्याकडेही अनेक निनावी पत्र येतात, म्हणून लगेच कोणावर कारवाई करायची ही परिस्थित नसते. एखाद्या आधिका-यावर कारवाई करण्याचा निर्णय केला तरी, त्याचे कुटूंब आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. ही संवेदनशिलता आम्ही जेव्हा दाखवतो तिच संवेदनशिलता तुम्ही शेतकरी आणि जनतेप्रती दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपुर यांनी केले. पहेलगाम येथील घटना आणि माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनाच्या घटनेमुळे सत्कार सोहळ्याला या कार्यक्रमात फाटा देण्यात आला. मंत्री सी.आर पाटील यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती स्थळावर जावून दर्शन घेतले.