एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे नंदनवनवर

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर या दोघांची ही पहिली भेट होती.या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ही केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे काही वेगळे राजकीय संकेत आहेत, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

शिंदे यांनी राज ठाकरेंचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीचे छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाली आणि त्यानंतर चर्चांना अधिकच उधाण आले. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या चर्चेत नेमके कोणते मुद्दे मांडले गेले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र मनसे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील ही भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले असून, लवकरच याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली होती. मात्र जानेवारीत जाहीर झालेल्या निकालांमध्ये या युतीला मुंबईत अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यभर झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी सर्वात कमकुवत ठरल्याचे चित्र दिसले. गेल्या महिन्यात मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी थेट लढत झाली होती.

प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीवर कठोर टीका केली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्याचवेळी राज ठाकरे यांनी पुढील राजकीय वाटचालीत लवचिक भूमिका घेण्याचे संकेतही दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र चर्चेचे नेमके मुद्दे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे पुढील राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता वाढली आहे. ही भेट भविष्यातील नव्या समीकरणांची सुरुवात ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech