निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर
मुंबई : राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज ‘सुपर संडे’ होता. सोमवारी रात्री प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर सभांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नेत्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी सर्वांची धावपळ पाहायला मिळत होती. मात्र, त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुका आता २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मंगळवारी होणारे मतदान आता पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. यामध्ये पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, ठाणे, सातारा, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
मतदान पुढे ढकललेले जिल्हे आणि त्यातील प्रभाग : पुणे जिल्हा (बारामती), सातारा जिल्हा (फलटण आणि महाबळेश्वर), यवतमाळ जिल्हा (दिग्रस, पांढरकवडा, वणी), सोलापूर जिल्हा (मंगळवेढा), अहिल्यानगर जिल्हा (कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी), चंद्रपूर जिल्हा (घुग्गुस), अमरावती जिल्हा (अंजनगाव सुर्जी, रेणापूर), ठाणे जिल्हा (अंबरनाथ), नांदेड जिल्हा (मुखेड, धर्माबाद), वाशिम जिल्हा (वाशिम, रिसोड), अकोला (बाळापूर)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभ्या राहिलेल्या अपीलांच्या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाने निर्णायक पाऊल उचलले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विविध आदेशांविरुद्ध काही उमेदवारांनी दाखल केलेल्या न्यायालयीन अपीलांमुळे काही नगरपरिषद व नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया अडकली होती. अशा ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
सुधारित निवडणूक कार्यक्रम : निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ४ डिसेंबर २०२५ , उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याचा दिनांक ११ डिसेंबर २०२५, आवश्यकता असल्यास मतदान २० डिसेंबर २०२५, मतमोजणी व निकाल २१ डिसेंबर २०२५ शनिवारी रात्री, राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक काढत काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती दिली. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यानुसार काही नगर परिषद आणि काही ठिकाणच्या प्रभागातील निवडणुका पुढे ढकल्याची माहिती समोर आली.
आयोगाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर दाखल झालेल्या अपीलांचे निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमांनुसार उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आवश्यक असलेला तीन दिवसांचा अवधी न देता थेट मतदान चिन्हे वाटप केली. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील १७ (१) (ब) या तरतुदींनुसार ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे आयोगाने नमूद केले.
पुण्याच्या बारामती नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी २ डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया तात्पूर्ती स्थगित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील (जि. पुणे) १२ जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी ६ जागांचा यामध्ये समावेश आहे. आमदार सुनील शेळकेंच्या बंधूच्या जागेची देखील निवडणूक पुढं ढकलली.