“अत्यंत विनाशकारी” विमान दुर्घटना : हवाई वाहतूक मंत्र्यांकडून दुःख व्यक्त

0

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी या घटनेला “अत्यंत विनाशकारी” संबोधले असून तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याचे देखील म्हटले आहे.

हवाई वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की, ते स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला आणि मन सुन्न झाले आहे.”आम्ही अत्यंत सतर्क आहोत. मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व हवाई वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांना त्वरित आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके रवाना करण्यात आली असून, अपघातस्थळी वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. माझ्या भावना आणि प्रार्थना विमानातील सर्व प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,” असे राम मोहन नायडू किंजरापू यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

एअर इंडियाने ‘एक्स’ वर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “एअर इंडियाची फ्लाईट AI171, अहमदाबाद-लंडन गॅटविक दरम्यान कार्यरत असताना आज, १२ जून २०२५ रोजी एका दुर्घटनेत सापडले. सध्या आम्ही तपशील गोळा करत असून, अधिक माहिती https://airindia.com आणि आमच्या एक्स हँडलवर लवकरात लवकर दिली जाईल”.

माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळले. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जखमींना शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी वेगाने बचाव, निर्वासन आणि अग्निशमन कार्य सुरू केले आहे. “आम्ही मृतांबद्दल आणि जखमींबद्दल अधिक माहिती गोळा करत आहोत,” असे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech