कन्नूर : केरळच्या न्यायिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. तान्या नाथन सी. या केरळच्या पहिल्या १०० टक्के दृष्टिहीन न्यायाधीश बनणार आहेत. न्यायिक सेवा परीक्षेत दिव्यांग उमेदवारांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवत तान्या यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे त्या देशातील दुसऱ्या १०० टक्के दृष्टिहीन न्यायाधीश ठरणार आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी तान्या कन्नूर जिल्ह्यातील तालिपरम्बा येथे एक प्रॅक्टिसिंग वकील म्हणून कार्यरत होत्या. अवघ्या २४ वर्षांच्या वयात त्यांनी हे यश मिळवून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. तान्या जन्मजात दृष्टिहीन असून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण धर्मा डोम या विशेष शाळेत घेतले. पुढे पारासिनीक्कडवू उच्च माध्यमिक शाळेतून दहावी आणि मोराझा सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
बारावीनंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि कन्नूर विद्यापीठातील एलएलबी अभ्यासक्रमात अव्वल स्थान मिळवले. त्या संस्थेतील त्या एकमेव दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या. तान्या नाथन यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नसून, तो दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा आणि समावेशक न्यायव्यवस्थेचा सशक्त संदेश देणारा ठरत आहे. यापूर्वी, २०१३ साली राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे भारतातील पहिले दृष्टीहिन न्यायाधीश ठरले होते. तर जागतिक स्तरावर सर जॉन अँथनी वॉल यांना जगातील पहिले १०० टक्के नेत्रहिन न्यायाधीश मानले जातात.
युनायटेड किंगडममध्ये चांसरी डिव्हिजनमध्ये १९९१ मध्ये उच्च न्यायालयाचे उप-मास्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दिव्यांग व्यक्तींच्या न्यायिक क्षेत्रातील सहभागाबाबत सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट भूमिका घेतली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका निकालात म्हटले होते की, “अंधत्व कोणत्याही उमेदवाराची न्यायाधीश होण्याची पात्रता कमी करू शकत नाही.” तसेच सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी १०० टक्के दृष्टिहीन कायद्याच्या विद्यार्थ्याला सीएलएटी पदव्युत्तर परीक्षा २०२४-२५ मध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती.