कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून राजकारण तापू लागले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी विविध पक्षात प्रवेश केले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका तथा महिला शहरअध्यक्षा कस्तुरी देसाई आणि त्यांचे पती मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी आपल्या मनसे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागातील चित्र पाहता आपण जनतेच्या हितासाठी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी कौस्तुभ देसाई यांनी दिली आहे. तर पक्ष नेतृत्वावर किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आपली कोणतीही नाराजी नसून मनसेमुळेच आपल्याला ओळख मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा की भाजपमध्ये याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ असेही कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई यांनी स्पष्ट केले. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे ९ नगरसेवक होते यातील ७ जणांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश केला असून आता फक्त सुनंदा कोट आणि तृप्ती भोईर या दोन नगरसेविका मनसेत राहिल्या आहेत.