त्या नक्षलवाद्यांवर १४ लाखांचे बक्षीस होते

0

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर ४ जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. यामध्ये मारले गेलेले चारही नक्षलवादी अतिशय कुख्यात होते. त्यांच्यावर एकूण १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. छत्तीसगड सीमेलगतच्या भामरागडच्या दाट जंगलांमध्ये पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त अभियानाने माओवादी चळवळीवर मोठा घाव घातला आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत, ३६ तासांपर्यंत चाललेल्या खडतर चकमकीत दलम कमांडरसह ४ कडव्या माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून ४ घातक शस्त्रे, वॉकीटॉकी, आणि माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे भामरागड-इंद्रावती पट्ट्यातील माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनंतर गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोच्या १२ तुकड्या आणि सीआरपीएफ ११३ बटालियनच्या डी कंपनीची

तुकडी इंद्रावती नदीच्या काठावरील कवंडे-नेलगुंडा परिसरात रवाना झाली. सकाळी ७ वाजता जंगलात घेराबंदी करत असताना माओवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला.पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केल्यानंतरही माओवाद्यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन महिला व दोन पुरुष अशा चार माओवादी ठार झाले. चकमक दोन तास चालली. उर्वरित माओवादी जंगलाचा फायदा घेत पळून गेले. या चकमकीत सन्नु पुंगाटी, अशोक वड्डे, विज्यो होयामी आणि करुणा वरसे हे ४ कुख्यात नक्षलवादी ठार झालेत. यामध्ये सन्नु मासा पुंगाटी हा भामरागड दलम कमांडर, होता त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते. तर अशोक उर्फ सुरेश वड्डे यांच्यावर २ लाखांचे आणि करुणा उर्फ ममीता

वरसे हिच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तसेच विज्यो होयामीवर १२ गुन्हे दाखल होते. त्यांच्याकडून एक एसएलआर, दोन ३०३ रायफल्स, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी आणि माओवादी प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. गेल्या ४ वर्षांत गडचिरोली पोलिसांनी ८७ माओवादी कार्यकर्त्यांचा खात्मा केला आहे, तर १२४ जणांना अटक व ६३ माओवादींनी आत्मसमर्पण केले आहे. या सातत्यपूर्ण मोहिमांमुळे माओवादी गटांमध्ये गोंधळ, अस्वस्थता आणि निष्क्रियता दिसून येत आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या अभियानाची प्रशंसा करताना जवानांच्या धाडसाचे अभिनंदन केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech