शिंदेंची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय शांत बसणार नाही – गणेश नाईक

0

नवी मुंबई : ही मंडळी भस्मासुर आणि बकासुराची अवलाद आहे. या भस्मासुरांनी महाराष्ट्र लुटला. त्यामुळे राज्य १० वर्ष मागे गेले. यांची जागा जेलमध्ये आहे. माझे मन आणि हातही साफ आहेत. त्यामुळे माझ्या नादाला लागलात, तर तुमची एकही महापालिका ठाणे आणि पालघर जिह्यात येऊ देणार नाही. तुमची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे आव्हान वन मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. वाशी येथील एका विशेष कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत नाईक यांनी पुन्हा एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा क्षेत्राचे खासदार नरेश म्हस्के यांना लक्ष्य केले. आमचे नवी मुंबईत असलेले राजकीस अस्तित्व संपण्याचा घाट शिंदे गटाने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घातला होता.

निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधीपासून मोठमोठी मातब्बर माणसे फोडण्याचा सपाटा लावला होता. पण नवी मुंबईतील जनतेने पालिका निवडणुकीत त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार केले. माझे मन आणि हात दोन्ही साफ आहेत. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही. यांनी गोरगरीबांच्या जमिनी हडप केल्या आणि बिल्डरांना दिल्या. वन विभागाची जमीन हडप करण्याचा घाटही त्यांनी घातला होता. मात्र मी वन मंत्री आहे तोपर्यंत वन विभागाची एकही इंच जमीन या भस्मासुर आणि बकासुराच्या घशात जाऊ देणार नाही. ही मंडळी भस्मासुर आणि बकासुर आहेत. यांच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असेही नाईक म्हणाले. कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा समोवश नवी मुंबई महापालिकेत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी परस्पर निर्णय घेतल्यानंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी तूर्तास थांबण्यास सांगितले होते. या गावांसाठी शासनाने ठरल्याप्रमाणे निधी द्यावा, ही मागणी भाजपची आजही आहे.

या गावांतील जनतेने आता भाजपचेच नगरसेवक निवडून दिले आहेत. तरीपण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. शिंदे गटाने माझ्या नादाला लागू नये. मला जर भाजपने परवानगी दिली, तर तुमचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नावापुढे माजी खासदार लिहावे लागेल. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के हे आता खासदार आहेत. मी मनात आणले तर त्यांना पुन्हा आयुष्यात कधी खासदार होता येणार नाही. आयुष्यभर माजी म्हणूनच राहतील. यांनी निवडणुकीत वाटलेला पैसा हा पापाचा आहे. ही सर्व पापे जर उघड झाली, तर ही सर्वच मंडळी जेलमध्ये जातील आणि लवकर बाहेरही पडणार नाहीत. यांच्या सर्व कारनाम्यांचे माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही, असेही नाईक म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech