मुंबई : जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवता, तर राज्य सरकारला एक वर्ष होऊनही अद्याप विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही, त्यावरुन कायदेशीर मागणी करत एकतर विरोधी पक्षनेते पद द्या नाहीतर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, कारण संविधानामध्ये तशी कुठेही तरतूद नाही. जी काही मंत्रिपदाची खाती त्यांच्याकडे असतील त्या खात्याचे मंत्री त्यांना बनवा, त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्यायच्या की बाथरुमच्या द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचं बिरुद लावता कामा नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
छावा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राम घायतिडक-पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे पुढे म्हणाले, यंदा कदाचित प्रथमच काळ आला आहे, राज्यात विरोधी पक्ष नेता नाही. विरोधी पक्षनेतेपद त्यांनी द्यायलाच पाहिजे. आम्ही विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती. सरकारला एक वर्ष होऊन गेले आहे, आम्ही विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली होती. गेल्या वर्षभरात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते पद नाही, इतिहासात पहिल्यांच अशी वेळ आली असेल.
विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार एवढं का घाबरतंय, दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकारविरोधी पक्षनेतेपदाला का घाबरत आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच दरम्यान, कायद्यानुसार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने जाहीर केले पाहिजे. नगरपालिका निवडणुकांमधील हुकूमशाहीवर भाष्य करताना, आधी बूथ कॅप्चर व्हायचे, आता निवडणुकाच कॅप्चर व्हायला लागल्या आहेत. तर, राज्य सरकारला एक वर्ष होऊनही अद्याप विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही, त्यावरुन कायदेशीर मागणी करत एकतर विरोधी पक्षनेते पद द्या नाहीतर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर न केल्यावरूनही ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांना केवळ उलट उत्तर देता येते सरळ कधी देतात. केंद्रीय कृषीमंत्र्यांना धन्यवाद देतो, कारण यांची सोंग उघडे पडले आहेत. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करायला हवे होते ही संज्ञा नाही असे बोलून ओला दुष्काळ टाळता येत नाही. अर्थमंत्र्यांनी म्हटले होते की, निवडणुकीमध्ये असे बोलावे लागते, हे खोटे सरकार आहे. हा प्रस्ताव गेल्यावर चर्चा कधी? पैसे येणार कधी, किल्ल्या कधी-कुठे असणार आणि मग शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसा येणार, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत, नाव आणि चिन्ह वेगळे असले तरी त्या बी टीम आहेत, त्यांचा मालक एकच आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी दिली. दरम्यान, दिग्विजय सिंह हे मुख्यमंत्री असल्यापासूनची आमची ओळख आहे, ते जंगलात सुद्धा बांधवगडमध्ये सोबत आले होते. बऱ्याच दिवसांनी ते मुंबईत आले होते. त्यामुळे, मला म्हटले भेटू इच्छितो, तेव्हा ही आमची वैयक्तिक भेट होती, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिग्विजय सिंह भेटीवर दिली.
मतदार याद्यांतील घोळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे. जसं भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालय स्वत:हून लक्ष घालतं, तसं हा लोकशाहीचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून लक्ष घातले पाहिजे, जोपर्यंत मतदार यादीतील हा घोळ मिटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी विनंती आम्ही सर्वोच्च न्यायालयाला करत आहोत. सध्या, निवडणुकांचा सीज़न सुरू आहे त्यात गडबड सुरू आहे, आपण जे अनुभवत आहोत तो अनुभव वाईट आहे. यापूर्वी निवडणुकांमध्ये मारामाऱ्या, हाणामाऱ्या होत होत्या. पण, आता बूथ कॅप्चरींगच्याऐवजी आख्खी निवडणूकच कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नगरापालिका निवडणुकांवर भाष्य केलं. सत्ताधाऱ्यांकडून स्वत:ची घरे भरण्याची काम सुरू आहे, आपण सगळे सुजाण नागरिक शिवसेनेकडे येत आहात तुम्हा सर्वांचे स्वागत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.