मुंबई ठरणार जागतिक भांडवलासाठीचे प्रवेशद्वार – मुख्यमंत्री

0

मुंबई : “जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात ‘विश्वासार्ह जागतिकीकरण’ ही संकल्पना पुढे येत असून महाराष्ट्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्र भारताच्या जीडीपीमध्ये १४ ते १५ टक्के योगदान देतो. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात २० टक्के वाटा आणि पश्चिमेकडील बंदरांमधून ६० टक्क्यांहून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रातून होते. मुंबई येत्या काळात जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक स्थैर्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. बहुध्रुवीय जगात विश्वासार्ह भागीदारीच यशस्वी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विदेश मंत्रालय, फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन कौन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेचे उद्धघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी एफइसीआयसीचे कार्यकारी संचालक विजय चौथाईवाले, एफइसीआयसीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य बाबा कल्याणी, आदिल झैनुलभाई, सायरिल श्रॉफ, प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील नेते, राजनैतिक समुदायाचे सदस्य आणि जागतिक भागीदार मोठया संख्येने उपस्थित होते.

परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश
जगासाठी भारत आशेचा किरण
“परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने फ्युचर इकॉनॉमिक को-ऑपरेशन कौन्सिल (एफईसीसी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनात्मक ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन (जीईसी) परिषद जागतिक पातळीवर झपाट्याने घडणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सखोल आंतरराष्ट्रीय आर्थिक संवादाला चालना देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ही परिषद उच्चस्तरीय व्यासपीठ म्हणून कार्य करते. ही परिषद धोरणात्मक नवोन्मेष आणि आर्थिक संधी यांच्या संगमावर विविध क्षेत्रांतील मंत्री, वरिष्ठ धोरणनिर्माते, अग्रगण्य अर्थतज्ज्ञ, जागतिक उद्योगनेते, गुंतवणूकदार आणि धोरणात्मक प्रतिनिधींना एकत्र आणते.

अनिश्चिततेच्या काळात स्थिर नेतृत्वाच्या शोधात असलेल्या जगासाठी भारत आशेचा किरण ठरला आहे. उच्च आर्थिक वाढ आणि कमी महागाई यांचा दुर्मिळ समतोल राखत, भारत जागतिक आव्हानांसाठी व्यावहारिक आणि विस्तारक्षम उपाय प्रदान करत आहे. एक मोठे आव्हान म्हणजे कोणालाही मागे न ठेवता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवणे आणि ते कार्यक्षमतेने साध्य करणे. भारताने जागतिक दर्जाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून उद्दिष्ट हे वास्तवात उतरवले आहे. पारदर्शकता आणि जबाबदारीसह ‘एकाच क्लिक’वर नागरिकांपर्यंत कल्याणकारी लाभ पोहोचवले जात आहेत. आज भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि शाश्वतता ही त्याच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेपैकी ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा अपारंपरिक (नॉन-फॉसिल) ऊर्जा स्रोतांमधून येतो, ज्यामुळे हा टप्पा गाठणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारत अग्रस्थानी आहे.

भारत आता ग्लोबल साऊथचा आत्मविश्वासपूर्ण आणि विश्वासार्ह आवाज म्हणून उदयास आला आहे. विविध सहभाग आणि दूरदृष्टीपूर्ण अजेंड्याच्या माध्यमातून अधिक संतुलित आणि सर्वसमावेशक जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषद अर्थव्यवस्थांमधील एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते . कल्पना, भांडवल आणि नवोन्मेष यांना जोडत अधिक सहकार्यपूर्ण आणि परस्परसंलग्न जागतिक आर्थिक भविष्यासाठी भक्कम पाया घालू शकते. या परिषदेत यशस्वी आणि परिणामकारक चर्चेसाठी प्रधानमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या.

पारदर्शकता, नियमन आणि व्यापकता यात मुंबई आघाडीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर्थिक सार्वभौमत्व म्हणजे आत्मनिर्भरता नव्हे; तर विविधीकृत व्यापार, उत्पादन क्षमता, ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षमता यांचे संतुलित संयोजन होय. धोरणात्मक स्वायत्तता आणि सहकार्यपूर्ण सहभाग. हाच दृष्टिकोन महाराष्ट्र स्वीकारतो. भविष्यातील जागतिक व्यवस्था कॉरिडॉर-आधारित असेल; भविष्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका पार पाडेल. आर्थिक लवचिकता प्रभावी ठरेल. पारदर्शकता, नियमन आणि व्यापकता यात मुंबई आघाडीवर राहील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech