जळगावातील शासकीय आरोग्यसेवा हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होणारे रुग्णालय; राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये– गिरीश महाजन

जळगाव : जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले केंद्र ठरले, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील, असे सांगून राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला.

केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय मशीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शेकडो नवजात बालकांना जीवनदान देणारी मिल्क बँक, मूतखड्यांसारख्या वेदनादायक आजारांवर मात करणारी लेझर मशीन यांसह अनेक अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज एमआरआय मशीन कार्यान्वित झाले असून, लवकरच सीटी स्कॅन मशीनही बसवण्यात येईल. अशी सर्व सुविधा असलेले हे शासकीय रुग्णालय राज्यातील पहिलेच आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय असे सर्व समाविष्ट असलेले देशातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech