जिष्णु देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

0

नौदलातर्फे मानवंदना; तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

मुंबई : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँडने वाजवलेल्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता ‘वंदे मातरम’ व राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. जिष्णु देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत. दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.


शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरु, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. सन २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. जिष्णु देव वर्मा यांनी वित्त, ग्राम विकास व ऊर्जा खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असलेले जिष्णु देव वर्मा हे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) संस्थेच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक होते आणि संस्थेच्या ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक होते. ते उत्तम लेखक व कवी देखील आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech