मुंबई : चैत्र पाडवा मराठी नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सन २०२६-२७ वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. गुढीपाडवा नववर्ष दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ५९ शाळांमधून गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा…या नावीन्यपूर्ण उपक्रमाला तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते सन २०२२ मध्ये शुभारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाला आजही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत नववर्षाची सुरुवात शाळेमध्ये नवागतांचे स्वागत करुन केली जाते. शाळा परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थी व दाखलपात्र विद्यार्थी यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षाकरीता शाळेत प्रवेश देण्यात येतात. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गुढीपाडव्याचा एक दिवस आधी केडीएमसी क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ राबविण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ करिता प्रवेश निश्चित करून देण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया ही माहे जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. केडीएमसीस्तरीय या उपक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आंबिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अटाळीते मनपा शा. क्र. ३२ या शाळेत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांच्यासह माजी नगरसेवक दशरथ तरे, महापौर ॲड हर्षाली चौधरी यांचे प्रतिनिधी तथा शिवसेना उपशहरप्रमुख विलास रंदवे, गावचे पोलिस पाटील भगत सहभागी झाले होते. नवागतांचे खाऊ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच केडीएमसीच्या विविध शाळांत हा उपक्रम राबविण्यात आला. केडीएमसीचे अधिकारी हे पालक अधिकारी म्हणून उपस्थित होते. तसेच स्थानिक नगरसेवक, समाजसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देखील उपस्थित होते.
खासगी शाळांप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देखील प्रवेश मिळवण्यासाठी पालकांचा असणारा उत्साह सर्व अतिथींच्या कौतुकाचा विषय बनला आहे. केडीएमसीच्या सर्व शाळांत प्रवेश प्रक्रिया सुरू असून सायंकाळी ५ पर्यंत ५१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध शाळांत झाले आहेत. शिक्षण उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे तसेच शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा…हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.