मुंबई : संजय राऊत यांनी चक्क उद्धव ठाकरे यांच्या बदनामीची ‘सुपारी’ काँग्रेसकडून घेतली आहे का? असा रोखठोक सवाल करत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊतांच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत प्रहार केला.
प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल राऊतांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन म्हणाले की, उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे नेतृत्व संपवून महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा हा मोठा डाव आहे. सध्या उबाठा गटात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे दोन स्पष्ट गट पडले असून, राऊतांच्या ‘भविष्यवाणी’ पेक्षा त्यांच्याच पक्षात मोठी खदखद सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘ज्यांना स्वतःचे ४० आमदार सोडून जाताना कळले नाही, त्यांनी दिल्लीतील स्फोटांच्या गप्पा मारणे हा मोठा विनोद आहे,’ असा टोला लगावत नवनाथ बन यांनी राऊतांना आरसा दाखवला. तसेच, ‘पाटकर फाईल्स’चा संदर्भ देत त्यांनी राऊतांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, ज्यांनी पोलिसांमार्फत बॉम्ब ठेवण्याचे समर्थन केले, त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर बोलू नये, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.